अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगर अर्बन कर्ज घोटाळा प्रकरणी पहाटे एव्हीआय इंजिनिअरींग कंपनीच्या संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. कर्ज रकमेचा गैरवापर करून दुसऱ्या बँकेचे कर्ज फेडले. यासह दुसऱ्या कर्जदाराच्या खात्यातून त्याच्या खात्यात काही रक्कम वर्ग झाल्याचेही समोर आले आहे.
बँकेत २९१ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याप्रकरणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. फॉरेन्सिक ऑडिटनुसार स्पष्ट झालेल्या गैरव्यवहाराची तपासणी करून कारवाई केली जात आहे
एव्हीआय इंजिनिअरींग वर्क्सच्या संचालकाने दोन कोटी ६७ लाख रुपये कर्ज घेतले. यातील काही रक्कम दुसऱ्या बँकेचे कर्ज फेडण्यासाठी, काही रक्कम स्वतःच्या नावे मुदतठेव मध्ये गुंतवणुकीसाठी, वैयक्तिक खरेदीसाठी कर्ज रकमेचा गैरवापर केला. तसेच, एव्हीआय इंजिनिअरींग वर्क्सच्या बँक खात्यावर कर्जदार संशयित आरोपी व्यंकटेश डेव्हल्पर्स यांच्या नावाने मंजूर कर्ज रकमेतून ६९ लाख ६० हजार रूपये वर्ग झाले आहेत.
ही रक्कम बँकेच्या एचओबीआयटी खात्यावरून बँकेचे कर्जदार पन्नालाल बगाडीया यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये वर्ग झालेल्या रक्कमेतून परत केल्याचे चेकव्दारे दाखवण्यात आले आहे. याप्रकरणी संचालक अविनाश प्रभाकर वैकर (रा.रासने नगर सावेडी अहमदनगर) याला अटक केली असून न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.