अहिल्यानगर | नगर सह्याद्री
वैभव नायकोडी याच्या अपहरण व खून प्रकरणातील आरोपींवर संदेश भागाजी वाळुंज (वय 19, रा. सम्राट नगर, चेतना कॉलनी, नवनागापूर) याचे अपहरण करून मारहाण केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात एका पोलिस कर्मचाऱ्याने घटनेची व दोघांना डांबून ठेवलेल्या ठिकाणची माहिती असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याची चर्चा आहे. त्याने वरिष्ठांना कळवले असते, तर पुढील अनर्थ टळला असता, अशी चर्चा सध्या पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी मात्र, या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले.
21 फेब्रुवारीला संदेश वाळुंज याचे तर 22 फेब्रुवारीला वैभव नायकोडी याचे अपहरण करण्यात आले. दोघांनाही एकाच फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. याची माहिती एका पोलिस कर्मचाऱ्याला मिळाली होती व त्याचा आणि आरोपींचा संपर्क झाल्याचीही चर्चा सध्या पोलिस वर्तुळात सुरु आहे. तोफखाना पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही बाब समोर आल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या संदर्भात पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना विचारले असता, या प्रकाराची चौकशी केली जाईल, यात कोणी दोषी सापडत असेल, तर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, खून प्रकरणातील आरोपींवर अपहरणाचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. अनिकेत ऊर्फ लपका याच्या सांगण्यावरून करण सुंदर शिंदे व रोहीत गोसावी हे संदेश याला जबरदस्तीने घरातून घेऊन गेले. त्याला लपकाच्या टपरीजवळ, गरवारे चौक याठिकाणी अनिकेत ऊर्फ लपका सोमवंशी, नितीन नन्नवरे, महेश पाटील, सॅम उर्फ सुमित थोरात, करण शिंदे, विशाल कापरे, रोहीत गोसावी, सोनु घोडके यांनी मारहाण केली. त्यानंतर गोल्डन सिटीजवळ रात्रभर मारहाण केली. रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या चेंबरमध्ये घालून, सर्व कपडे काढून नग्न करून मारहाण करून त्रास दिला. त्यानंतर चेतना कॉलनीतील एका फ्लॅटवर नेऊन डांबून ठेवले व जिवंत सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी केली. त्यांनी वैभव नायकोडी याचा खून केल्याचे कोणाला सांगू नये, यासाठी संदेशला दोन दिवस डांबून ठेवले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी अधीक्षक राकेश ओला यांनी स्वतः आरोपींची चौकशी केली. तसेच, मंगळवारी नाशिक येथील फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून आरोपींच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. काही नमुनेही घेण्यात आले. सदर आरोपींवर यापूवचेही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे, असे अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.