पारनेर। नगर सहयाद्री-
पारनेर तालुयातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समाजल्या जाणार्या टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतची ग्रामसभा जलजीवन मिशन पाणी योजना व पाण्याच्या टाकीवरून वादळी ठरली. बाजार तळावर झालेल्या ग्रामसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच तू तू मै मै झाली.
ग्रामसभेसाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून पारनेर पंचायत समितीचे उपाभियंता पी. पी. पंडित, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब दावभट, सरपंच सौ. अरुणा खिलारी, माजी सरपंच सौ. सुनीता झावरे, माजी सरपंच शिवाजी खिलारी, बाळासाहेब खिलारी, माजी उपसरपंच सुनील चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडुंगे, भाऊसाहेब खिलारी, बापूसाहेब रांधवन, शुभम गोरडे, श्रावण नाना गायकवाड, जयसिंग झावरे, किसन धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. टाकळी ढोकेश्वर गावातील जलजीवन मिशनचे काम चालू असून हे काम संथ व निकृष्ट होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
माजी सरपंच शिवाजी खिलारी व किसन धुमाळ यांनी रस्त्याच्या कडेच्या साईड पट्ट्यावरून पाईपलाईन टाकली असून भविष्यात येथे डांबरी रस्ता झाला तर कनेशन अथवा पाणी पुरवठा योजनेच्या दुरूस्तीचे काम करता येणार नाही. अनेक वाड्यावस्त्या पाण्यापासून वंचित असून त्याचा आराखडा फलक चौकामध्ये लावण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रावण गायकवाड यांनी गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागे संदर्भात प्रश्न उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी केली. वासुंदे चौकात उपबाजार समिती झाली असती तर अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला असता व टाकळीचा विकास झाला असता, असे ते म्हणाले.
पाण्याची टाकी २ लाखांची, बिले ९ लाखांची?
टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून धुमाळ वस्ती येथे पाणीपुरवठ्यासाठी ९ लाख ५० हजार रुपये खर्च करून नवीन पाण्याची टाकी बांधली आहे. सत्ताधारी व त्या प्रभागातील काही सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांनी टाकीस विरोध केला होता. प्रत्यक्षात येथे दुसरी टाकी चांगली असतानाही मोठा खर्च करून ही टाकी बांधली आहे. तसेच टाकीला सिमेंट प्लास्टर केले नसून टाकीसाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च झाला असताना ९ लाख ५० हजार रुपये बिले कोणी काढली, असा आरोप माजी सरपंच शिवाजी खिलारी व सामाजिक कार्यकर्ते किसन धुमाळ यांनी केला. पारनेर पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पी. पी. पंडित यांनी पाहणी केली असून ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशी मागणी करण्यात आली.
विरोधकांकडून विकास कामे अडवण्याचे काम: सरपंच खिलारी
आमच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली. या विकास कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून आणला आहे. त्यामुळे विकास कामांत विरोधक राजकारण करत असून विकास कामे अडवण्याचे काम होत आहे, असा आरोप सरपंच अरूणा खिलारी यांनी केला.