मुंबई / नगर सह्याद्री –
सयाजी शिंदे हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी मराठी, हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये अनेक भूमिका केल्या आहेत, त्यांची भूमिका असलेले अनेक चित्रपट हे हीट ठरले आहेत, या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ज्यामध्ये गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, गोष्ट छोटी डोंगरा ऐवढी, तांबव्याचा विष्णूबाळा असे अनेक चित्रपट सांगता येतील, दरम्यान सयाजी शिंदे हे फक्त एक अभिनेतेच नसून त्यांचं वृक्षसंवर्धनामध्ये देखील मोठं योगदान आहे. त्यांनी महाराष्ट्रात मोठी वृक्ष वाचवण्याची चळवळ सुरू केली आहे, त्यासाठी त्यांनी सह्याद्री देवराई नावाच्या सामाजिक संस्थेची स्थापना देखील केली आहे. दरम्यान सध्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक परिसरातल्या तपोवन परिसरातील काही वृक्ष तोडण्यात येणार आहेत.
या वृक्षतोडीला नाशिकमधील पर्यावरण प्रेमींकडून तीव्र विरोध होत आहे. विकास झाला पाहिजे पण वृक्षतोड न होता, वृक्षाचं संवर्धन महत्त्वाचं असल्याचं या पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे. हे प्रकरण आता चांगलंच गाजलं असून, यावर प्रतिक्रिया देताना सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. तपोवनमधील वृक्षतोड ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, मला नाशिकमधून फोन येत आहेत, एक झाड तोडलं तर आम्ही शंभर लोक मरायला तयार आहोत, झाड तोडून दाखवा असा थेट इशाराच आता सयारी शिंदे यांनी सरकारला दिला आहे.
नेमकं काय म्हणाले सयाजी शिंदे
मला नाशिकमधून फोन येत आहे, मला तिकडे जाणं शक्य नाही, पण असे लाखो वनप्रेमी आहेत जी अशा झाडांसाठी झटत आहेत आणि हे असे जर आंदोलन होत असेल तर त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. तोपवनमधील वृक्षतोडीचा जो काही मुद्दा आहे, त्या संदर्भात माझा तेथील वन्यप्रेमींना पूर्ण पाठिंबा आहे. गिरीश महाजन म्हणतात की आम्ही एक झाड तोडलं तर दहा झाडं लावू तुम्ही चेष्ठा करत आहात का? आतापर्यंत कोणत्या हायवेच्या कडेला तुम्ही झाडं लावली आहेत? असा थेट सवालही यावेळी सयाजी शिंदे यांनी यावेळी केला आहे, तसेच एक झाड तोडलं तर आम्ही शंभर लोक मरायला तयार आहोत, झाड तोडून दाखवा असा थेट इशाराच शिंदे यांनी दिला आहे, त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.



