अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
नगर शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असून, रस्ते दुरुस्तीची संथ गती, अव्यवस्थित वाहतूक नियोजन आणि चौकांवरील कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून प्रमुख चौकांवर अतिरिक्त प्रशिक्षित वाहतूक कर्मचारी तातडीने नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून रस्ते व पायाभूत सुविधा दुरुस्तीची अनेक कामे सुरू आहेत. मात्र ही कामे अत्यंत धीम्या गतीने होत असल्याने अनेक रस्ते बंद किंवा मर्यादित वहातुकीसाठी खुले ठेवावे लागले आहेत. परिणामी शहरात दररोज भयंकर कोंडी निर्माण होत असून, तासनतास वाहनांचा तांडा एकाच ठिकाणी अडकून बसत आहे.
दरम्यान, या कोंडीचा सर्वाधिक परिणाम अत्यावश्यक सेवांवर होत असल्याचे लंके यांनी निदर्शनास आणून दिले. विशेषतः रुग्णवाहिका अडकण्याच्या घटना वाढल्या असून, काही वेळा जीवितहानीची प्रकरणेही समोर आली आहेत. चिंतेची बाब म्हणजे दुरुस्ती सुरू असलेल्या ठिकाणी किंवा गर्दीच्या चौकांवर अनेकदा वाहतूक निरीक्षक किंवा कर्मचारीच उपस्थित नसल्याचे नागरिकांनी तसेच प्रसारमाध्यमांनी अधोरेखित केले आहे.
खासदार लंके यांनी शहरातील २० महत्त्वाच्या चौकांवर किमान दोन वाहतूक पोलिस तातडीने नेमण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे. यात जुना तोफखाना, तारकपूर बसस्टँड, डीएसपी चौक, मार्केटयार्ड, भाजी मार्केट गेट, अहिंसा चौक, स्वस्तिक चौक, कायनेटिक चौक, अमरधाम चौक, महात्मा फुले चौक, सारडा कॉलेज चौक, साईदीप हॉस्पिटल रोड, कोठला स्टँड, माळीवाडा बसस्टँड, आनंदधाम, सक्कर चौक, पुणे स्टँड प्रवेशद्वार, हॉटेल अर्चना चौक (केडगाव), आयुर्वेद चौक आणि जिल्हा परिषद परिसराचा समावेश आहे.
सध्याची परिस्थिती शहरातील संपूर्ण वाहतूक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे सांगत, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीची उपाययोजना राबविण्याचा आग्रह लंके यांनी केला आहे.



