श्रीगोंदा । नगर सहयाद्री
शेतातून जनावरांसाठी चारा आणताना ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला, तर आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहे. हा हादरवून टाकणारा अपघात उक्कडगाव (ता. श्रीगोंदा) येथे बुधवारी (दि. २६) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडला.
मृतांमध्ये प्राप्ती किरण महाडिक (वय १०) आणि शिवांश किरण महाडिक (वय ४) या बहीण-भावाचा समावेश आहे. तर कावेरी किरण महाडिक (वय ३५) आणि मुलगी क्रांती किरण महाडिक या गंभीर जखमी असून, त्यांच्यावर शिरूर (पुणे) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कावेरी महाडिक बुधवारी सायंकाळी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन शेतात गेल्या होत्या. सोबत त्यांची तीन मुलेही होती. चारा घेऊन परत येत असताना ट्रॅक्टरवरील त्यांचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला.
अपघात इतका गंभीर होता की ट्रॅक्टरखाली चारही जण अडकले. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत सर्वांना बाहेर काढले. प्राप्ती आणि शिवांश यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. कावेरी आणि क्रांती महाडिक यांच्यावर उपचार सुरू आहेत.या दुर्दैवी घटनेमुळे उक्कडगाव परिसरात शोककळा पसरली आहे.



