विळद परिसरात घडली होती घटना | स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर | नगर सह्याद्री
विळद परिसरत पर्यटकावर दरोडा टाकुन लुटणारी टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने जेरबंद केली आहे. या कारवाईत पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ही कारवाई केली आहे.
सुरेश रणजीत निकम, विलास संजय बर्डे, रोहित संदीप शिंदे, ज्ञानेश्वर भानुदास बर्डे, शांताराम भानुदास काळकुंड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ३ ऑगस्ट, २०२४ रोजी वैभव उत्तम सहजराव विळद परिसरातील गवळीवाडा वॉटर फॉल नगर येथे फिरण्यास गेले होेते. त्यावेळी अनोळखी ५ इसमांनी फिर्यादीस लाथाबुया व काठीने मारहाण करुन ६,९०० रुपये किंमतीचा मोबाईल फोन, चांदीची चैन, अंगठी व रोख रक्कम चोरून नेली होती.
या संदर्भात पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी हे राहुरी परिसरातील कात्रड परिसरात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईची माहिती पोलिस निरीक्षक आहेर यांनी दिली. सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनीही कारवाई केली.