नेवाशाच्या तरुणावर एट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील २७ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नाही तर, पीडितेचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिची बदनामी केल्याप्रकरणी नेवासा तालुक्यातील एका तरुणावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्कारासह ॲट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ठाणे येथे राहणाऱ्या २७ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. रोहन रमाकांत डहाळे (वय २५, रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली. दि. १७ ऑक्टोबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान, त्याने नगर-बाभुळगाव रोडवरील मुळा डॅम परिसरातील ‘ग्रीन व्हॅली रिसॉर्ट’ येथे पीडितेवर वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. काही काळानंतर, जेव्हा पीडितेने या कृत्याबाबत वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने त्याच्याकडे असलेले पीडितेचे खाजगी फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. “तू जर कोठे तक्रार केलीस, तर हे सर्व फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करेन,” अशी धमकी त्याने पीडितेला दिली.
या संपूर्ण प्रकारानंतर पीडित तरुणीने अखेर धाडस दाखवत मंगळवारी (दि. ४ नोव्हेंबर) मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पीडितेच्या तक्रारीत जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही उल्लेख असल्याने, पोलिसांनी आरोपी रोहन डहाळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६९ (लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध), ३५१(२) (ब्लॅकमेलिंग/धमकी) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या गुन्ह्याचा पुढील तपास तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.



