अहिल्यानगर | नगर सह्याद्री
21 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार प्रकरणातून ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांना अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 22 जुलै रोजी रात्री कोतवाली पोलीस स्टेशन येथे काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मध्यरात्री त्यांना राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
काळे यांच्या वतीने ॲड. राहुल पवार यांनी जोरदार युक्तिवाद केला. सरकारी पक्षाची देखील बाजू मांडली गेली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला. अटक झाल्यावर तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर काळे यांची 25 जुलै रोजी नाशिक सेंट्रल जेल येथे न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. ही घटना सुमारे दोन ते तीन वर्षांपूव घडल्याचे फिर्यादीने म्हटले होते.
नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून काळे यांना त्यांचा सोशल मीडियातून फोन नंबर मिळवत मदतीसाठी संपर्क साधला. त्यानंतर काळे यांनी पीडितेला आपल्या चितळे रोडवरील संपर्क कार्यालयात बोलवत वारंवार अत्याचार केल्याचे म्हणणे फिर्यादीने नोंदविले होते. मात्र जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयासमोर सुनावणी सुरू असताना तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक नगर शहर यांनी लेखी अहवाल सादर केला.
फिर्यादीने फोनवरून संपर्क झाल्यानंतर बलात्कार झाल्याचे म्हटले होते. मात्र काळे आणि फिर्यादी यांचा सीडीआरचा सखोल तपास करत पडताळणी केली असता फिर्यादी व काळे यांचे कधीही संभाषण झालेले नसल्याचे समोर आले. या मुद्द्यावरून ॲड. पवार यांनी जोरदार युक्तीवाद केला. अखेर काळे यांचा जामीन मंजूर झाला आहे.