Maharashtra Rain Update: राज्यात कालपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यानंतर आजदेखील पावसाचा जोर काय राहणार आहे. आजदेखील मुंबईत रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याता आला आहे. याचसोबत शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
राज्यात पुढील २४ तासांसाठी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. १७ ते २१ ऑगस्टपर्यंतच अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जर महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच जर काही अडचण आली तर महापालिकेने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. १९१६ या नंबरवर संपर्क साधू शकतात. पुढील २४ तासांसाठी मुंबई, रायगड, पुणे घाट, सातारा घाट,रत्नागिरी, कोल्हापूर घाट या ठिकाणी रेड अलर्ट दिला आहे.
या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत तर पहाटेपासूनच पावसाचा जोर कायम आहे. याचसोबत पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव,छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपुर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच INCOIS तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरीत किनारपट्टी भागात उंच लाटांचा इशारा दिला आहे. समुद्राची स्थिती खवळलेली आहे व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.