मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगर पंचायतीसाठी १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छूक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.
यावेळी राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील २४७ नगरपरिषदेपैकी ३३ पदे अनुसूचित जातींसाठी व ११ पदे अनुसूचित जमातीसाठी आणि ६७ पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. तर १३६ पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
२ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी
यासाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होईल आणि मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. तर उद्या १८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी करण्यात येणार तर २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.



