अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी थकबाकीपोटी महापालिकेने आक्रमक कारवाई करत नगर मनमाड रस्त्यावरील झेडके बॉलीवूड कॅफे व बालिकाश्रम रस्त्यावरील गणपती कारखाना सील केला आहे. उपायुक्त प्रियांका शिंदे यांच्या उपस्थितीत प्रभाग अधिकारी बबन काळे व कर संकलन अधिकारी विनायक जोशी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
मार्क स्केवर अपार्टमेंट येथील तिसरा मजल्यावर असलेल्या झेड के बॉलीवूड कॅफेकडे 4 लाख 2 हजार 762 रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे कॅफे सील करण्यात आले. तसेच भिंगारदिवे मळा, बालिकाश्रम रोड येथील मालमत्ताधारक भागवत यांचा गणपतीचा कारखाना 2 लाख 30 हजार 197 रुपयांच्या थकबाकीपोटी सील करण्यात आला आहे.
सिव्हिल हडको येथील मालमत्ताधारक शांतीलाल दत्तात्रय औटी यांच्याकडे असलेल्या मालमत्ता कराच्या 2 लाख 51 हजार 879 रुपयांच्या थकबाकी पोटी पथकाने कारवाई सुरू करताच त्यांनी आठवड्याभरात संपूर्ण रक्कम भरण्याची तयारी दर्शवली. तसेच, मालमत्ताधारक लिलाबाई धोंडीराम राठोड यांच्या संभाजीनगर रोडवरील हॉटेल मातोश्रीची मालमत्ता करायची थकबाकी 1 लाख 43 हजार 472 रुपये असल्याने त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित करण्यात आली. दोन्ही मालमत्ताधारकांनी आठवडाभरात संपूर्ण रक्कम भरण्याची तयारी दर्शवल्याने त्यांच्यावरील कारवाई स्थगित करण्यात आली.