Monsoon Update : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी, विदर्भात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडण्याची चिन्हं हवामान खात्याने वर्तवली आहेत. आज (बुधवार) विदर्भातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरींची शक्यता आहे.
राज्यात इतरत्र हवामान ढगाळ राहणार असून, काही भागांमध्ये तुरळक हलक्याफुलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सूर्योदय आणि पावसाच्या लपंडावामुळे तापमानात चढ-उतार दिसून येत आहेत. सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक ३१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही तास विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता असली तरी विजांच्या कडकटामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना आवश्यक आहेत.
या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट
हवामान विभागाने अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.