Maharashtra Crime: परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सोनपूर तांडा येथे पतीने पत्नीवर शेतामध्ये धारदार शस्त्राने सपासप १२ वार करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २८ ऑगस्ट) दुपारी उघडकीस आली. हल्ल्यानंतर आरोपी विजय राठोड घटनास्थळावरून फरार झाला असून जिंतूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हत्या झालेल्या महिलेचे नाव विद्या विजय राठोड (वय ३२ वर्षे) असे असून, ती आपल्या शेतामध्ये गेली असताना तिचा नवरा विजय राठोड याने तिच्यावर पोट व छातीवर १२ वेळा तीव्र हत्याराने वार केले. हल्ला इतका भयावह होता की, विद्याचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी तिला तत्काळ जिंतूर येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर सोनपूर तांडा परिसरात एकच खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी विजय राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. या घटनेचा तपास जिंतूर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.