अहिल्यानगर । नगर सहयाद्री
नगर तालुक्यात गोवंश तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, गोरक्षकाच्या जीवावर बेतलेली घटना कामरगाव शिवारात रविवारी (दि. ५ ऑक्टोबर) पहाटे घडली. कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून नेल्या जाणाऱ्या १७ गोवंशीय जनावरांची सुटका करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोरक्षकास ट्रकच्या साहाय्याने चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी ट्रकसह एकूण ११ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी सतीश ज्ञानेश्वर मोरे (वय ३२, रा. सौरभनगर, भिंगार) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, नाजीम ऊर्फ पापा गुलाब बेपारी, खालिद इब्राहीम कुरेशी (दोघे रा. बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे), फिरोज रशीद शेख (रा. घोडेगाव, ता. नेवासा) आणि ट्रकचा अज्ञात चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कामरगाव शिवारातील डी-मॅक कंपनीजवळ पुणे-अहिल्यानगर महामार्गावर पहाटे ३ वाजता संशयित ट्रक (एमएच 46 ए आर 6385) अडवण्याचा प्रयत्न केला.
ट्रक थांबवण्याचा इशारा देताच चालकाने थेट ट्रक मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यात काही जण जखमी झाले. गोरक्षकांनी धाडस दाखवत ट्रकचा पाठलाग करून तो थांबवला. तपासणीअंती ट्रकमध्ये १७ गोवंशीय जनावरे अतिशय अमानुष पद्धतीने कोंबलेल्या आढळून आल्या.
या गायी कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती उघड झाली. ट्रक आणि गायींसह एकूण ११ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पतंगे करत आहेत.