अहमदनगर । नगर सहयाद्री:-
पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील पडोळे वस्तीवरील मराठी शाळेच्या जवळ चार शालेय विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवून आणि चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
घटनेवेळी अज्ञात व्यक्तीने एक ओमिनी गाडी उभी करून विद्यार्थ्यांना गाडीत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक जागरूक ग्रामस्थाने तत्काळ कारवाई करत या अज्ञात व्यक्तींना विचारपूस केली आणि परिसरातील लोकांना घटनास्थळी बोलावले. लोक जमा होताच, अज्ञात व्यक्तींनी विद्यार्थ्यांना सोडून गाडीला धुम ठोकली.
या प्रकारामुळे घाटशिरससह परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी, सहावी-सातवीत शिकणारे तीन ते चार विद्यार्थी सायकल खेळत असताना, त्यांना गाडीतील अज्ञात व्यक्तींनी चॉकलेटचे आमीष दाखवून पळवण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचा वातावरण पसरला आहे. सरपंच गणेश पालवे यांनी पालक आणि शिक्षकांना अधिक सजग राहण्याचे आवाहन केले आहे.