spot_img
अहमदनगरकेडगावमध्ये भाईगिरीचा थरार!, तरुणावर धारदार शस्राने वार, वाचा अहिल्यानगर क्राईम

केडगावमध्ये भाईगिरीचा थरार!, तरुणावर धारदार शस्राने वार, वाचा अहिल्यानगर क्राईम

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
केडगाव परिसरात दोन दिवसांपूव झालेल्या किरकोळ वादाचा जाब विचारल्याच्या रागातून एका तरुणावर धारदार शस्राने हल्ला केल्याचा प्रकार घडला. तसेच मी इथला भाई आहे असे सांगत आरोपीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय सुग्रीव वराट (वय 25, रा. मोहिनी नगर, केडगाव) यांनी फिर्यादी दिली आहे. 23 सप्टेंबर रोजी त्यांचा भाऊ अभिषेक वराट हा केडगावमधील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना आरोपी राहुल भाऊसाहेब शिंदे (रा. लोंढे मळा, केडगाव) व त्याच्या साथीदारांनी त्याच्याशी वाद घालून मारहाण केली होती. या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी 25 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास अक्षय व अभिषेक अंबिका बस स्टॉपजवळील चहाटपरीवर गेले असता, तेथे आरोपी राहुल शिंदे त्याच्या इतर साथीदारांसह उपस्थित होता. जाब विचारताच आरोपीने उद्धटपणे, मी इथला भाई आहे, तुला काय करायचं ते कर असे म्हणत धारदार शस्राने हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जखमी अक्षयवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी राहुल शिंदे व त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृद्ध महिलेचे मंगळसूत्र पळवले
वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवल्याची घटना गुरुवारी सकाळी गुलमोहर रोडवरील कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ घडली. आसरा सोसायटी परिसरात राहणाऱ्या ६६ वर्षीय वृद्ध महिला आपल्या पतीसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्या गुलमोहर रोडवरून पाईपलाईन रोडमार्गे घरी परतत होत्या. त्यांचे पती भाजी घेण्यासाठी थांबले असताना त्या एकट्याच पुढे निघाल्या. त्या सिध्देश्वर कॉलनीजवळ पोहोचल्या असता, पाठीमागून मोपेडवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी हॉर्न वाजवून त्यांना बाजूला होण्यास सांगितले. काही क्षणातच त्यातील एकाने गाडीवरून उतरून पाठीमागून धावत येत वृद्ध महिलेच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र पळवले. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीजेचा दणदणाट भोवला; मंडळाच्या अध्यक्षासह डीजे चालकावर गुन्हा दाखल
नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीत न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली करून कर्णकर्कश डीजे वाजवल्याप्रकरणी मंडळाच्या अध्यक्षासह डीजे चालकावर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. २४ सप्टेंबर रोजी वैष्णवनगर ते रेणुकामाता मंदिर मार्गावर जय तुळजाभवानी प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने चोळी-पातळ मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी आवाजाची मर्यादा उल्लंघन केल्याचे पोलीस ध्वनीमापक पथकाच्या तपासणीत निष्पन्न झाले. झेंडा चौक येथे आवाजाची पातळी तब्बल ९८.२ डेसिबल इतकी नोंदविण्यात आली, जी कायद्याने ठरविलेल्या मर्यादेपेक्षा अधिक होती. शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही आणि पोलिसांकडून पूर्वसूचना देऊनही डीजेचा आवाज कमी न केल्यामुळे पोलिसांनी कठोर पाऊल उचलले. या प्रकरणी ध्वनी प्रदूषण अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम, आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डीजे सिस्टीम व मिरवणुकीसाठी वापरलेले वाहनही जप्त केले आहे.

जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण
शहरातील कानडे मळा परिसरात भाडेकरूच्या क्षुल्लक वादातून एक ६५ वर्षीय वृद्ध महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या हल्ल्यात महिलेला दुखापत झाली असून, गळ्यातील मंगळसूत्रही गहाळ झाले आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मयुर छत्रपती खैरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानडे मळा परिसरात राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या घरात एक भाडेकरू राहत आहे. त्याने गटारीत पाणी टाकल्याच्या कारणावरून आरोपी मयुर खैरे याने त्या भाडेकरूला शिवीगाळ करत वाद घातला. वाद मिटवण्यासाठी वृद्ध महिला मध्यस्थी करण्यासाठी गेल्या असता, आरोपीने संतापून त्यांच्यावर दांडक्याने हल्ला चढवला. हल्ला करताना आरोपीने, राहत असलेली जागा मला विकली नाहीस तर तुला ठार मारीन,अशी धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

पैशांसाठी विवाहितेचा सासरी छळ; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा
शेती खरेदीसाठी माहेरहून पैसे आणावेत, तसेच चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहितेने महिला भरोसा सेलच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिला मूळची नेवासा तालुक्यातील असून सध्या केडगाव येथे वास्तव्यास आहे. तिचा छळ लग्नापासूनच सुरु होता. पती बाळासाहेब दत्तात्रय तांदळे, सासू अल्का बाळासाहेब तांदळे, सासरे दत्तात्रय शंकर तांदळे, दीर शेखर बाळासाहेब तांदळे, चुलत दीर कैलास तांदळे आणि नणंद स्वाती सोमनाथ पालवे (सर्व रा. गणेशवाडी, ता. नेवासा) यांनी वेळोवेळी संगनमत करून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. आरोपींनी पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ केली, मारहाण केली, तसेच शेतीसाठी माहेरातून पैसे आणण्याची मागणी करत तिला उपाशीपोटी कामाला लावले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

तारकपूर परिसरातील पानटपरीवर एलसीबीचा छापा
शहरात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटख्याची विक्री सर्रास सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने गुरुवारी रात्री तारकपूर बस स्टँडसमोरील ‘ग्लोबल पान शॉप’ वर छापा टाकून गुटख्याचे ११ बॉक्स जप्त केले. या कारवाईत पानटपरी चालक अल्तमश फयाज सय्यद (२७) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबीचे पथक अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना, पोलिस हवालदार गणेश धोत्रे यांना गुटख्याच्या विक्रीबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, रात्री दहाच्या सुमारास पंचांसह पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी अल्तमश सय्यद गुटखा विकताना रंगेहाथ सापडला. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत ‘डायरेक्टर’ कंपनीच्या प्रतिबंधित गुटख्याचे ११ बॉक्स सापडले. चौकशीत आरोपीने हा माल झेंडीगेट परिसरातील सोहेल सादिक शेख याच्याकडून घेतल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार सुनील विनायक पवार यांनी फिर्याद दिली असून, आरोपीवर भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा कायदा यांच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर, पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार; साडी नेसवलेल्या मामा पगारेंचाही सन्मान करणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था राज्यातील पूरग्रस्त पीडित शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांपासून ते अनेक...

महाराष्ट्रात अस्मानी संकट, फडणवीसांचा दिल्ली दौरा, पंतप्रधानांचे मोठे आश्वासन?

नवी दिल्ली / नगर सह्याद्री - राज्यावर मोठं संकट कोसळलं आहे, महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस झाला...

मोहटा देवी यात्रा; विखेंचा लंकेंना टोला! काय म्हणाले पहा…

पदावर येण्यापूर्वी स्वार्थासाठी अशा यात्रा आयोजित करतात पदावर आल्यावर यात्रा बंद करतात: सुजय विखे...

धक्कादायक! कार्यालयातच आयुक्तांना अरेरावी, राष्ट्रवादीचा कडक इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने घटनेचा निषेध | धडा शिकवण्याचा दिला इशारा अहिल्यानगर । नगर सहयाद्री महानगरपालिकेचे प्रशासक तथा...