अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
”तो जर आम्हांला दिसला तर आम्ही त्याला जिवे ठार मारणार आहोत,” अशी धमकी देत एका तरुणाच्या नावाने शिवीगाळ करत घरासमोर गोंधळ घातल्याची घटना जुना बाजार, भिस्तगल्ली परिसरात घडली. संतप्त आरोपींनी फिर्यादीच्या शेजाऱ्याच्या दोन मोटारसायकली, फिर्यादीच्या समजून, पाडून त्यांची तोडफोड केली. गुरुवारी (दि. ६) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
या प्रकरणी अरफात अब्दुल रऊफ शेख (वय-३०, रा. जुना बाजार, भिस्तगल्ली) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरफात शेख हे गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी झोपलेले असताना, घराबाहेरून मोठमोठ्याने शिवीगाळ करण्याचा आवाज आला. त्यामुळे ते घराच्या टेरेसवर गेले.
त्यावेळी घरासमोर विजय गजानन भनगडे, संघराज दत्तात्रय जगताप आणि सुरज पोपट सरोदे (सर्व रा. बोहरी चाळ, रेल्वेस्टेशन) हे तिघे जण अरफात शेख यांचे नाव घेऊन शिवीगाळ करत होते. “कुठे आहे तो जहागीरदार अरफात, तो दिसला तर त्याला जिवे ठार मारणार,” अशा धमक्या ते देत होते.
तसेच, आरोपींनी फिर्यादी शेख यांच्या घराशेजारी राहणारे मोबीन सय्यद यांच्या दोन मोटारसायकलींना लाथा मारून खाली पाडले. या मोटारसायकली अरफात शेख यांच्याच आहेत, असा समज आरोपींचा झाला होता. त्यांनी दोन्ही मोटारसायकलींचे मदगार्ड व ‘खोपडी’ फोडून नुकसान केले.
या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड करत आहेत.



