अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
खोटे संमतीपत्र व शपथपत्र सादर करून न्यायालयाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तिघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरूवारी (3 एप्रिल) रात्री गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आश्रू यादव नरोटे (वय 62, रा. लक्ष्मीनगर, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. नरेश विष्णुपंत कोडम (वय 46), जयश्री नरेश कोडम (वय 42, दोघे रा. तपोवन रस्ता, अहिल्यानगर), रूपेश प्रकाश कोडम (वय 41, रा. मुळा कालवा सर्वेक्षण उपविभाग, पांडाणे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी नरोटे व संशयित आरोपी यांच्यामध्ये सिव्हिल न्यायाधीश यांच्या समोर एक प्रकरण दाखल आहे. या प्रकरणात संशयित आरोपींनी संगनमताने खोटे दस्त तयार केले. संशयित आरोपी जयश्री कोडम व रूपेश कोडम हे प्रत्यक्षात नाशिक येथे नोकरी करत असतानाही त्यांनी राहाता न्यायालयात हजर असल्याचे खोटे शपथपत्र सादर केले. हे शपथपत्र वापरून त्यांनी बनावट संमतीपत्राव्दारे फिर्यादीच्या मालमत्तेवर दावा करून ती हडपण्याचा प्रयत्न केला.
ही फसवणूक माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे उघड झाली असून, त्यामुळे अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, कोर्ट नं. 3, अहिल्यानगर यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 156(3) अंतर्गत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. भिंगार कॅम्प पोलिसांनी तिघा संशयित आरोपींविरूध्द भादंवि 420, 463, 464, 465, 468, 471, 120 (अ), 120 (ब), 196, 199, 200, 209, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निसार शेख करीत आहेत.