Maharashtra News: पुलाखाली तीन मृतदेह आढळले आहेत. पोलिसांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढून तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आयुब महमद नदाफ, रेश्मा हुसेन होटगी, जया लक्ष्मण कांबळे अशी मयत व्यक्तींची नावे आहे.
पुलाखाली तीन मृतदेह आढळले आहेत. यातील दोन मृतदेह हे महिलांचे, तर एक मृतदेह पुरुषाचा आहे. हे तीनही मृतदेह दोन दिवसांपूर्वी पाण्यात पडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोमवार दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी सदरची घटना उघडकीस आली.
आयुब महमद नदाफ, रेश्मा हुसेन होटगी, जया लक्ष्मण कांबळे सर्व राहणार आनंद नगर मुरूम, तालुका उमरगा हे तिघेजण मोटारसायकल क्रमांक एम एच 13 सी इ 0810 ने सोलापूरहून मुरूम कडे जात होते. दरम्यान पुलाला संरक्षक कठडा नसल्याकारणाने रात्रीच्या वेळी दिसले नसल्याने पुलावरून मोटारसायकल पाण्यात पडली असल्याचा अंदाज नागरिकांतून व्यक्त होत आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सदरची घटना धाराशिवमधील बाभळगावजवळील सोलापूर-हैदराबाद महामार्ग क्रमांक ६५ वर घडली आहे.