अहमदनगर । नगर सहयाद्री: –
शेवगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपन्यांच्या नावाखाली तब्बल 55 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात संजय सुधाकर जोशी (वय 48 वर्षे, रा. गदेवाडी, शेवगाव, अहमदनगर) व सुभाष जनार्धन आंधळे ( वय 45 वर्षे, रा. सोनेसांगवी, शेवगाव, अहमदनगर ) यांच्या फिर्यादीवरून दोन गुन्ह्यात पाच आरोपींविरुध्द पंचावन्न लाख पन्नास हजार रुपयेची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हाच्या तपासकामी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी तीन पोलीस पथक शेवगाव, पैठण, अहमदनगर, बीड, पुणे येथे रवाना केले होते. पथकाने तीन सापळा लावुन आरोपींना पैठण जि.छ.संभाजीनगर व गेवराई जि.बीड अशा ठिकाणांवरुन सुनिल बाबासाहेब पुरी (रा .रावतळे कुरुडगाव, शेवगाव), बाबासाहेब गोरक्षनाथ पुर (रा. रावतळे कुरुडगाव, शेवगाव) शिवाजी कचरु वंजारी ( रा.नजिक बाभुळगाव, शेवगाव ) यांना ताब्यात घेतले असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, सपोनि महेश माळी, पोसई अमोल पवार यांच्या पथकाने केली आहे.