नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा खेळाडू विराट कोहलीच्या सुरक्षेबाबत एक मोठी माहिती समोर आली असून कोहलीच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगितले जात आहे.
आयपीएल २०२४ स्पर्धेतील एलिमिनेटरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ चेन्नईला क्वालिफायर २ चा सामना खेळण्यासाठी रवाना होईल. तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.
दैनिक आनंद बाजार पत्रिकाने गुजरात पोलीस अधिकाऱ्यांचा हवाला देऊन नमुद केले आहे की, विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका असल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने प्रशिक्षण सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही संघांनी पत्रकार परिषदही घेतली नव्हती. गुजरात पोलीसांनी सोमवारी (२० मे) रात्री अहमदाबादच्या विमानतळावर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय घेऊन ४ अज्ञातांना अटक केली आहे. पोलीसांनी या अज्ञातांचा ठावठिकाणा शोधून काढला असता, त्या ठिकाणी संशयास्पद व्हिडिओ आणि शस्त्र जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर १ आणि एलिमिनेटरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर स्टेडियमवर होणार आहे. क्वालिफायर १ च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणिक सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सराव गुजरात कॉलेजच्या ग्राऊंडवर सुरु होता. अचानक प्रशिक्षण रद्द करण्याचा निर्णय का घेतला, याबाबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून कुठंलही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये.