कोतवाली पोलीस ठाण्यात बंटी परदेशी याच्याविरूद्ध फिर्याद दाखल
अहमदनगर | नगर सह्याद्री
एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे कार्यकर्त्यांसह गेले असता गौरव उर्फ बंटी परदेशी (रा. चितळे रोड) याने त्यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली असून, काळे यांनी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे, अरुणकाका, संग्रामभैय्या यांच्या विरोधात परत बोलशील तर तुझा तुझ्याच काँग्रेसच्या शिवनेरी कार्यालयासमोर भर चौकात गोळ्या घालून खून करेल, अशी धमकी देण्यात आली. काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्ष मनोज सुवालाल गुंदेचा यांनी दुसरी फिर्याद गौरव उर्फ बंटी परदेशी यांच्या विरोधात नोंदवली आहे. त्यात म्हटले आहे की, परदेशी याने गुंदेचा यांना कोतवाली पोलीस स्टेशन आवारात, तुझा नेता किरण काळे माझ्या विरोधात फिर्याद देऊ राहिला आहे. त्याला सांग फिर्याद दे नाहीतर काही कर, त्याने अरुणकाका जगताप, संग्रामभैय्या जगताप विरोधात व्हिडिओ फेसबुकवरून व्हायरल केला. त्या किरण काळेचा मी खून करणार म्हणजे करणारच, अशी धमकी दिल्याचा गुन्हा गुंदेचा यांच्या फिर्यादीवरून नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, या संदर्भात काळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. परदेशीचे आजी, माजी आमदारासमवेतचे फोटो त्यांनी यावेळी पत्रकारांना दाखवले. काळे म्हणाले, चार जानेवारीला मी फेसबुक वरून एक व्हिडिओ शहरातील भयानक स्थितीबद्दलचा अपलोड केला होता. त्यामध्ये अरुण जगताप, संग्राम जगताप यांच्यावर भाष्य केले होते. तो व्हिडिओ एका युट्युब चॅनेलवरून तो व्हायरल झाला होता.
जगताप यांनी दहशतीच्या जोरावर तो काढून टाकायला लावला. त्या व्हिडिओचा राग धरून आता त्यांचे पंटर छाताडात गोळ्या घालण्याच्या, खून करण्याची भाषा करू लागले आहेत. उद्या माझ्या जीवाचे तसेच काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला सर्वस्वी जगताप पिता पुत्र जबाबदार राहतील. घडलेला प्रकार दोन्ही ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी तात्काळ ते फुटेज ताब्यात घेऊन जतन करावे. परदेशी प्रचंड दारू प्यायला होता. त्याची आम्ही त्याच ठिकाणी दारू पिल्या बाबतची चाचणी करण्याची मागणी केली होती. मात्र त्याची चाचणी आम्ही असेपर्यंत करण्यात आली नव्हती.
काळे म्हणाले, कोतवाली पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या दालनामध्ये फिर्याद नोंदवून घेण्यापूर्वी मला पाचारण केले. माझ्या फिर्यदीचा मजकूर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या दालनात वाचून दाखविला. त्याला आम्ही आक्षेप घेतला. अशाप्रकारे ज्याच्या विरोधात फिर्याद आहे त्याला ती नोंदवण्यापूर्वीच मजकूर सांगून गोपनीयतेचा भंग करणे योग्य नाही. स्वतः पोलीस निरीक्षकांसमोर परदेशी याने सांगितले की मला काळे यांच्या विरोधात खोटी फिर्याद द्यायची आहे, ती घ्या. खोट्या फिर्यादी दाखल करण्याचा अड्डा कोतवाली पोलीस स्टेशन झाली आहे काय? पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांसमोरच अशा गोष्टी केल्या जात असतील आणि खोट्या फिर्यादी नोंदवून घेतल्या जात असतील तर पोलीस स्टेशन हे पोलीस चालवतात की राष्ट्रवादी काँग्रेसचे गुंड चालवतात, असा सवाल यावेळी काळे यांनी उपस्थित केले.