बीड / नगर सह्याद्री :
अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार दाखल केली आहे.
तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, कटात सहभागी होण्यासाठी एक लाखाची ऑफर देण्याच आल्याचेदेखील त्याने म्हटलं आहे. शिवाय संशयिताने कराचीतील लोकेशन देखील पाठविले आहे. या प्रकाराने तक्रारदार तरुण हादरला. त्याने लगेचच पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे.
नेमकं काय घडलं?
एक तरुण सोशल मीडियाचा वापरकर्ता आहे. सोशल मीडिया वापरत असताना त्याला एक मेसेज आला. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दिली. आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाठी संशयिताने कराचीतील लोकेशनही तरुणाला पाठवले. शिवाय कटात सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर दिली. या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक लाख देऊ तर मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असे संशयिताने मेसेज द्वारे सांगितले. बीडच्या तरुणांला धमकीचा मेल आल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराला धमकी देण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही सप्टेंबर 2024मध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर धमकी दिली होती. त्यानंतर या तरुणाला बिहारच्या भागलपूर अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर, राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होण्याआधी अनेकदा धमक्या देण्यात आल्या. यानंतर एप्रिल 2025 मध्ये अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई मेल अयोध्या राम मंदिर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या डीएमना आला होता. हा ई मेल तामिळनाडूतून आल्याची माहिती समोर आली होती. तर ‘मंदिराची सुरक्षा वाढवा’ असं देखील धमकीच्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले होते.