राजकारण तापले | भाजप उमेदवाराकडून काँग्रेस उमेदवाराला दमबाजी
बीड | नगर सह्याद्री
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. कुठे काही उमेदवार स्वत:हून उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत. तर काही उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली जात आहे. पण बीडमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराला घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपाचे गेवराईचे उमेदवार गीता पवार यांच्याकडून काँग्रेसच्या उमेदवारांना थेट घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घ्या म्हणत थेट धमकी देण्यात आली. काँग्रेसच्या उमेदवार संजीवनी चाळक यांनी थेट भाजपाच्या उमेदवार गीता पवार यांच्याविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
बीडच्या गेवराईमध्ये भाजपने माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भाऊजई गीता पवार यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तिकीट दिले. गीता पवार यांच्याविरोधात काँग्रेसने संजीवनी चाळक यांना उमेदवारी दिली. गेवराईमध्ये गीता पवार आणि संजीवनी चाळक यांच्यात काँटे की टक्कर सुरू आहे. पण अर्ज मागे घेण्याच्या तारखेच्या आदल्या रात्री गीता पवार यांनी संजीवनी चाळक यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी संजीवनी यांच्या घरी जाऊन अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सध्या बीडमध्ये या घटनेची चर्चा होत आहे.



