संगमनेर | नगर सह्याद्री
राज्यातील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गतिशील करण्यात आली असून, त्याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. मात्र, आता शासनाने तातडीने दुसरा टप्पा सुरू करून शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली. शिक्षक भरतीसाठी पोर्टलच्या अंमलबजावणीमध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळे हजारो उमेदवारांना नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पहिल्या टप्प्यात काही त्रुटी आढळल्या होत्या. त्या दुरुस्त करूनच दुसरा टप्पा सुरू करावा, जेणेकरून शिक्षक भरती प्रक्रिया अधिक सुरळीत आणि न्याय्य होईल. पूव सरकारने शिक्षणसेवक हे पद निर्माण केले होते, मात्र आता त्याची आवश्यकता नसल्याचे नमूद करत, हे पद रद्द करून उमेदवारांची थेट शिक्षक म्हणून नियुक्ती करावी, अशीही आ. तांबे यांनी मागणी केली. त्यांनी सांगितले की, शिक्षणसेवक पदामुळे अनेक उमेदवारांना अन्याय सहन करावा लागत आहे, त्यामुळे यावर त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे.
राज्यात हजारो उमेदवार शिक्षक पदासाठी प्रतीक्षेत असून, रिक्त जागा असूनही भरती प्रक्रिया विलंबात आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी त्वरित करावी, असेही आ. तांबे यांनी स्पष्ट केले.
उमेदवारांना थेट शिक्षक म्हणून नियुक्ती द्या
शिक्षणसेवक हे पद राज्य सरकारने शिक्षक भरती प्रक्रियेत अंतरिम स्वरूपात तयार केले होते. या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियमित शिक्षकांप्रमाणे सेवा दिली जात असली, तरी त्यांना कमी वेतन आणि मर्यादित सेवा सुविधांचा लाभ मिळतो. त्यामुळे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतरही शिक्षणसेवकांना स्थैर्य आणि संपूर्ण लाभ मिळत नाहीत. त्यामुळे हे पद रद्द करून उमेदवारांची थेट शिक्षक म्हणून नियुक्तीची मागणी होत आहे.