पारनेर । नगर सहयाद्री:-
आमच्या झावरे कुटुंबाने नेहमीच जनतेची सेवा केली, पण काही राजकीय पुढारी निवडणुकीनंतर मला टार्गेट करतात. माझ्या मतांचा वापर करून पदे मिळवायची आणि माझ्याबद्दल तिरस्कार ठेवायचा, हा दुटप्पीपणा आहे. निवडणुकीआधी पाय पडणारे आज पाय ओढण्यात मग्न आहेत.
यापेक्षा कलियुगाचा दुसरा अर्थ काय? सर्व पुढारी एका बाजूला आणि मी एका बाजूला असे चित्र आहे. तरीही जनतेच्या हक्कांसाठी मी खंबीरपणे लढत राहीन. मनाला वेदना होत असल्या तरी चेहऱ्यावर हसू ठेवून कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेईन असे स्पष्ट मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले.
श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पारनेर तालुक्यातील यादववाडी येथील श्री गणेश मंदिर सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते व माजी सभापती गणेश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या सोहळ्यास सरपंच, उपसरपंच, चेअरमन, मीनाताई यादव, तुकाई देवस्थान अध्यक्ष राजेंद्र शेळके, शहांजापूरचे सरपंच अण्णा मोटे, रविंद्र पाडळकर, संतोष यादव, सुभाष यादव, रमेश औटी, संतोष शेळके, जालिंदर तानवडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थितांनी सुजित झावरे पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. यादववाडीतील हे विकासकाम स्थानिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सुजित झावरे पाटील यांनी जनतेच्या मूलभूत गरजांसाठी कायम कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.