अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शेवगाव तालुक्यातील आव्हाणे येथे शटरवर ज्वालाग्राही पदार्थ टाकून व दुकान पेटवून दिल्या प्रकरणी राहुल सीतराम कोळगे (वय-३३, रा. वाघोली रोड, आव्हाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
आव्हाणे येथे गेल्या १९ ऑक्टोबर रोजी रोजी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास साई गणेश या किराणा दुकानाला नष्ट करण्याच्या उद्देशने तीन अनोळखी इसमांनी त्यांच्याकडील बाटलीमधून पेट्रोल/डिझेल सदृश ज्वालाग्राही पदार्थ दुकानाच्या शटरवर ओतला आणि आग लावली. यात किरणा दुकानाचे मोठ्या प्राणात नुकसान झाले आहे. या घटनेबाबत राहुल सीताराम कोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घऊेन त्यांना तात्काळ अटक करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी सपोनि हरीश भोये व पोलीस अंमलदार राहुल द्वारके, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, रिचर्ड गायकवाड, बाळासाहेब नागरगोजे, जालिंदर माने, किशोर शिरसाठ, प्रमोद जाधव, सोनल भागवत, चालक चंद्रकांत कुसळकर तसेच शेवगाव पोलीस ठाण्याचे पोउपनि रामहरी खेडकर व पोलीस अंमलदार नकुल फलके, दादासाहेब खेडकर अशांचे पथक नेमून आरोपीस अटक करण्यासाठी रवाना केले.
गेल्या ३० नोव्हेंबर रोजी या गुन्ह्यातील आरोपी हे अहिल्यानगर येथील तपोवन रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ तपोवन रोड येथे सापळा लावून दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांची नावे नीलेश शिवाजी नेहुल (वय-२६ वर्षे रा. आव्हाणे बु ाा ता. शेवगाव) बवाज उर्फ गौरव सॅमसन उजागरे (वय – २४ वर्षे रा. पिराजवळ, उजागरे मळा, बुरुडगांव, ता. जि. अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या इसमांना सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी अभिषेक बाळसाहेब साळवे (रा. झोपडपट्टी, बुरुडगाव)असल्याचे सांगितले. साळवे फरार आहे.
ताब्यातील दोन आरोपींना शेवगाव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व शेवगाव पोलीस ठाण्याचे उपरोक्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.



