संगमनेरमध्ये थोरातांच्या समर्थनार्थ विराट मोर्चा
संगमनेर | नगर सह्याद्री
तालुयातील पोलिस घरगडी असल्यासारखं वागतात. खोट्या केसेस करतात. ते काम थांबवलं पाहिजे. जे विष पेरले जात आहे ते ओळखा. आता गुंड लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी आता अमृतसेना तयार करावी लागणार असा इशाराच काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.
किर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना नथुराम गोडसे स्टाईलने धमकी दिल्याच्या निषेधार्थ (२१ ऑगस्ट) संगमनेरमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून बाळासाहेब थोरात यांनी धमकीविरोधात मी मरायला तयार असल्याचे म्हणाले. पुढे बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा आहे. मी महात्मा गांधी होऊ शकत नाही मला माहित आहे, मात्र तत्त्वांसाठीमी मरायला देखील तयार आहे. राज्यात अशीच परिस्थिती असून बीडमधील प्रकार आठवतोय ना? विधिमंडळात मारामार्या, मंत्र्याकडे नोटांचे बंडल दिसतात. हे सगळं झाकण्यासाठी कोकाटे यांचा बळी घेतला गेला, असा आरोप त्यांनी केला.
विद्यमान आमदार माझा डीएनए तपासा म्हणतो. म्हणजे थेट माझ्या आईवर बोलतात. त्यांना हे समजत का? संगमनेर तालुका हे सहन करणार का? असा सवाल त्यांनी केला. आमच्यावर आरोप केला आम्ही लोक पाठवली. मात्र, घुलेवाडीमध्ये सगळे कर्मचारी राहतात ते कीर्तनासाठी गेले असतील. वारकरी संप्रदाय असल्याने स्थानिक लोक जातात, असेही त्यांनी सांगितले.
एक बाई यू ट्यूबवर आपल्याला शिव्या देते, तिला कोण पैसे पुरवतं? अशी विचारणा त्यांनी केली.मोर्चदरम्यान राज्यातील अनेक नेत्यांनी केलेल्या आरोपांचे व्हिडीओ दाखवून खंडन केले. यावेळी थोरात यांच्या समर्थनार्थ विविध संघटना, संगमनेरमधील मोठा जनसमुदाय जमला होता. मोर्चाला आमदार सत्यजीत तांबे, जयश्री थोरात, डॉ. कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले.
भंडारेंची टीका फक्त थोरातांवर नव्हे संगमनेरकरांवर: आ. तांबे
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत नेते आहेत. भंडारे यांनी फक्त बाळासाहेब थोरात यांच्यावर केलेली नाही तर संगमनेरकरांवर टीका केलीय. आम्हीही प्रखर हिंदुत्वादी आहोत. आमच हिंदुत्व कोणत्या समाजाला त्रास देण्याचे नाही. बाळासाहेब थोरात यांनी संपूर्ण तालुक्यातील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच आज संगमनेर तालुक्यातील जनता थोरात यांच्या पाठिशी आहे. तालुक्याचा विकास भरकटला असून रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून तालुक्याची संस्कृती बिघडविण्याचे काम सुरु असलेल्याचे सांगत लोकप्रतिनिधी अमोल खताळ यांचा आमदार सत्यजीत तांबे यांनी समाचार घेतला.