अहिल्यानगर । नगर सहयाद्री
गुरुपौर्णिमेनिमित्त माजी खासदार व भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथे कुटुंबासमवेत साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माझ्या नवयुगातील राजकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच माझे गुरु आहेत असे वक्तव्य केले. साईबाबांच्या दर्शनानंतर सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना सुजय विखे पाटील यांनी मी यशस्वी खासदार जरी नसलो तरी यशस्वी राजकारणी असल्याचे सांगितले. माझ्या या नवयुगातील राजकारणातील फडणवीस हेच गुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजोबा स्व. बाळासाहेब विखे पाटील हे नेहमीच गुरु राहिले. मात्र माझ्या राजकारणातील प्रवासात आजचे गुरु फडणवीस आहेत असे ते म्हणाले.
तसेच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत खासदारकी विषयी भाष्य केले. मी यशस्वी खासदार असतो तर मी माजी झालो नसतो असे ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे भेट दिली. विविध उपक्रमात सहभागी झाले. त्यांनी पत्नी व मुलांसह साई बाबांच्या समाधीचे दर्शनही घेतले.