उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मेळाव्यात झावरे यांना डावलले
पारनेर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुजित झावरे पाटील यांनी पक्षातील काही नेत्यांवर गंभीर आरोप करत त्यांच्याच विरोधातील राजकीय षड्यंत्राचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी पक्षातील बदललेली भाषा, चेहरे आणि स्वतःच्या राजकीय हत्येचा प्रयत्न होत असल्याचा खळबळजनक दावा केला. प्रामाणिकपणाचे फळ शून्य मिळेल, असे कधी वाटले नव्हते, असे सांगत त्यांनी आपली खदखद व्यक्त केली.
सुजित झावरे यांनी सांगितले की, 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून वडील माजी आमदार स्व. वसंतराव झावरे पाटील यांनी पक्षासाठी झटून काम केले. गावोगावी पक्षाचा प्रसार करताना त्यांनी अनेक प्रलोभनांना नकार देत पक्षनिष्ठा जपली. मात्र, याच निष्ठेचे फळ म्हणून त्यांची उमेदवारी कापण्यात आली. आणि ते मनोबल खचलेल्या अवस्थेत आजारी पडले. त्यांच्या निधनानंतर 2014 मध्ये पक्षाने मला 12 दिवस आधी उमेदवारी दिली. 2019 मध्ये निलेश लंके यांना पक्षात आणत मला बाजूला सारले. 2024 मध्ये राज्याचे नेते अजित पवार व डॉ. सुजय विखे यांच्या सांगण्यावरून काशिनाथ दाते यांच्यासाठी प्रचार केला आणि वासुंदे गावातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून दिले.
मात्र, निवडणुकीनंतर पक्षाची भाषा आणि चेहरे बदलल्याचा आरोप सुजित झावरे यांनी केला. जे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, त्यांनी माझ्या पाया पडून मतं मागितली, पण आता ते माझी राजकीय हत्या करत आहेत, असे सुजित झावरे पाटील आमदार काशिनाथ दाते यांचे नाव न घेता म्हणाले. त्यांनी रोजगार हमीची कामे थांबवणे, पक्षाच्या बॅनरवरून स्वतःचा आणि वडिलांचा फोटो काढणे, तसेच स्टेटसवरून फोटो हटवण्यास सांगणे यांसारख्या कृतींवर संताप व्यक्त केला. तुमची ओळख माझ्या कुटुंबामुळे आहे, हे विसरू नका, असा इशारा त्यांनी आमदार काशिनाथ दाते यांना दिला.
सुजित झावरे यांनी अजित पवार यांच्या पारनेरमधील मेळाव्याला निमंत्रण न मिळाल्याबद्दलही दुखः व्यक्त केले. जनता माझ्या पाठीशी आहे, लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन करत त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवत पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, आगामी काळात झावरे वेगळा निर्णय घेणार का? असा प्रश्न राजकीय जाणकार विचारत आहेत.
दसरा मेळाव्यात सुजित झावरे यांना डावलेले
पारनेर येथे महायुती राष्ट्रवादी पक्षाचा दसरा मेळावा होत असून या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. परंतु तालुक्यातील पक्षातील महत्त्वाचे समजले जाणारे नेते सुजित झावरे पाटील यांना या मेळाव्यात डावलण्यात आले असल्याने व त्यांना नियोजनामध्ये कुठेही स्थान न दिल्यामुळे सुजित झावरे पाटील समर्थक प्रचंड नाराज झाले असून त्यांनी मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.
निमंत्रण सुद्धा नाही याचे दुःख
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पारनेर तालुक्यात मेळाव्यासाठी येणार आहेत. याचे निमंत्रण सुद्धा नाही याचे दुःख वाटत आहे.
सुजित झावरे पाटील (राष्ट्रवादीचे नेते)