अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमवाघा वाघा येथे शुक्रवारी मध्यरात्री अनिल मारुती गुंजाळ यांच्या घरात चार अज्ञात चोरट्यांनी घुसून प्राणघातक हत्याराने हल्ला करत १ लाख ३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले. या घटनेत गुंजाळ यांच्यासह शेजारी हरीभाऊ देवराम जाधव यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. अनिल गुंजाळ (वय ४२, रा. निमवाघा वाघा) हे कुटुंबासह घरी झोपले असताना चोरट्यांनी लाकडी दांडके आणि धारदार हत्यारासह घरात प्रवेश केला. त्यांनी गुंजाळ यांना आणि कुटुंबियांना मारहाण करून ७० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, २५ हजारांचे सोन्याचे झुबे, ३ हजारांचा सोन्याचा डाग आणि ५ हजारांच्या चांदीच्या अंगठ्या असा ऐवज बळजबरीने हिसकावला.
गुंजाळ यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मदतीसाठी धावलेले शेजारी हरीभाऊ जाधव यांच्यावरही चोरट्यांनी हल्ला केला. त्यांच्या डोयावर, मानेवर आणि शरीरावर प्राणघातक हत्याराने वार करून जखमी केले.