अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील कल्याण रोड परिसरातील रायगड हाईट्स या सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी चोरी करून पोलिसांना आव्हान दिले आहे. गुरुवारी (दि. 09) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंंगमध्ये लावलेली एक संपूर्ण मोटारसायकल चोरली, तर इतर तीन मोटारसायकलींची चाके काढून नेली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी शिक्षक असलेले संजय विठ्ठल शिंदे (वय 39, रा. रायगड हाईट्स, गणेशनगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच 16 सीपी 1088 ) सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावली होती. गुरुवारी सकाळी ते कामावर जाण्यासाठी घराबाहेर आले असता त्यांची दुचाकी जागेवर दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता, त्याच सोसायटीमधील किरण अशोक माने, हर्षल देवराम गोडे आणि मोतीराम उत्तम शिंदे यांच्याही मोटारसायकलींना चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे दिसून आले.
चोरट्यांनी किरण माने आणि हर्षल गोडे यांच्या दुचाकींची समोरील चाके, तर मोतीराम शिंदे यांच्या दुचाकीची दोन्ही चाके चोरून नेली असल्याचे निदर्शनात आले. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. या प्रकारामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चिंता वाढली असून, आरोपीना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहेत.