शिर्डी । नगर सहयाद्री :-
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. अनैतिक मानवीव्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत (पिटा) शहरातील चार हॉटेल्सना सील ठोकण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या आदेशाने व पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वात शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवारी कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आले.यापूर्वी पिटा कायद्यान्वये कारवाई झालेल्या हॉटेल्सवर सील करण्यासाठी प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
त्यांची परवानगी मिळताच पोलिसांनी साई वसंत विहार लॉज (सोनार गल्ली), हॉटेल साईइन (दत्तनगर, पिंपळवाडी रोड), हॉटेल साई वीरभद्र (सुतार गल्ली), आणि हॉटेल शीतल (निमगाव) या चार हॉटेल्सना सील केले. या व्यापक मोहिमेत इतरही अनेक कारवाया करण्यात आल्या. पोलिसांनी 18 अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करत 8 पुरुष आणि 6 महिलांना अटक करून न्यायालयात हजर केले. दारूबंदी कायद्यान्वये चार गुन्हे दाखल करून 12,040रुपयांचा मुद्देमाल, तर जुगार कायद्यान्वये एका प्रकरणात 65,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, 2013 पासून फरार असलेला आरोपी शंकर-वेरणस्वामी आणि पाहिजे असलेला आरोपी दिनेश मोकळ यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.