अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून आमदार सत्यजीत तांबे यांनी याच असंतोषाचा वाचा हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात फोडली आहे. या मार्गाच्या मूळ आराखड्यानुसार तो संगमनेर तालुक्यातून जाणं अपेक्षित असताना रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात कोणताही बदल न करता तो संगमनेरमधूनच नेण्यात यावा, अशी आग्रही मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून सिन्नर व संगमनेर तालुक्यात भूसंपादनही केले आहे. असं असताना अचानक या मार्गात बदल करत तो संगमनेरऐवजी राजगुरूनगरवरून थेट शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आ. तांबे म्हणाले. पुणे-नाशिक या दोन महानगरांना जोडणारा रेल्वेमार्ग महारेलच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या रेल्वेमार्गामुळे पुण्यातील चाकण, भोसरी आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि मुसळगाव या चार औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता होती.
या निर्णयामुळे संगमनेरकरांचं मोठं नुकसान होणार असून जनतेत प्रचंड रोषाचं वातावरण तयार झाले आहे. शिर्डीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या याआधीच धावत आहेत. नाशिक-शिर्डी एकमेकांशी जोडलेले आहेत. मात्र संगमनेर अद्याप रेल्वेच्या नकाशावर नाही. त्यामुळे आमच्या भागासाठी हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग आहे. परिणामी राज्य सरकारने मूळ आराखड्यात बदल न करता हा मार्ग संगमनेरवरूनच न्यावा, अशी मागणी आ. तांबे यांनी केली आहे.
आ. तांबेंनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घेतली होती भेट
नाशिक-पुणे सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला विलंब होत आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करायची मागणी भेटीत केली होती. २५ ते ३० टक्के भूसंपादन प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. अशा वेळी प्रकल्पात बदल करणे घातक आहे. त्यामुळे महारेलसोबत प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू ठेवून पूर्वी ठरल्याप्रमाणे मूळ मार्ग कायम ठेवा. ट्रेनचा मार्ग बदलून प्रकल्पाला वळसा न घालता सरळ दिशेने नेण्याची मागणी आ. तांबेंनी केली होती.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी सगळ्यांनी संघर्ष करावा!
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग मूळ नियोजनानुसारच अस्तित्वात यावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येत या विरोधात लढा दिला पाहिजे. तरच या पट्ट्यातील लाखो लोकांना या रेल्वेमार्गाचा लाभ होऊ शकेल. संगमनेर मधील सर्व जनतेने पुणे-नाशिक रेल्वे मार्गात बदल न करता हा मार्ग संगमनेरवरूनच न्यावा यासाठी संघर्ष करावा.
– आमदार, सत्यजीत तांबे