मुंबई । नगर सहयाद्री:-
गेल्या पाच वर्षात अनेक पक्षाकडून राज्यातील राजकारणाला राजकीय हादरे बसले आहे. लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची चिन्हं असून पहिला भूकंप हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्याची चिन्हं असून दुसरा भूकंप हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. भाजप आणि शिंदे गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसलाय.विद्यमान खासदारांच्या सहा जागाही शिंदे गटाला गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र राहिलं तर आपल्याला पाच वर्ष घरी बसावं लागेल असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे 6 आमदार शिवसेना ठाकरेंच्या संपर्कात असून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील अशीच अवस्था निर्माण झाली आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने अजित पवारांच्य दहा आमदारांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे.
आमदारांनी अभिनंदनपर संदेश करत सुप्रिया सुळेंशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळं अजित पवार गटाचे १० नाराज आमदार परतीच्या वाटेवर असून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाच्या नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.