Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उत्तर भाग, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच, राज्यात वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी पर्यंत राहू शकतो.
सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागांत उन्हाळ्याचा जोर वाढला आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटा तीव्र होत असून, तापमान चाळीशीपार गेले आहे. मात्र, पश्चिमी झंझावाताच्या प्रभावामुळे हवामानात बदल होत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
जळगाव, धुळे, नंदूरबार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरणासोबत हलका पाऊस पडू शकतो. तसेच, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तापमानाचा तीव्र दाह अनुभवणाऱ्या नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.राज्यात अनेक भागांत हवामान ढगाळ असताना मुंबईत मात्र कोरड्या वाऱ्यांची सरशी राहणार आहे.
पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांत तापमान किमान 26 ते 27 अंशांदरम्यान राहू शकते, तर दुपारी कमाल तापमान 36 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. वास्तविक उष्णतेची तीव्रता 38 अंशांपर्यंत जाणार असल्याने मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. सध्याच्या हवामान स्थितीनुसार, राज्यात उन्हाचा तडाखा कायम राहणार असला तरी काही भागांत पावसाचे सावट दिसून येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.