अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
रस्ताच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना अहिल्यानगर तालुक्यातील शिंगवे नाईक ते गोपी मळा रस्त्यावर बुधवारी (2 एप्रिल) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी घनश्याम संतोष पुंड (वय 27 रा. शिंगवे नाईक, ता. अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक रोहिदास जाधव, सोन्याबापू जगन्नाथ निकम, प्रकाश चंदू माळी, अजय काशीनाथ माळी, दीपक बर्डे आणि सागर बर्डे (सर्व रा. रामवाडी, शिंगवे नाईक, ता. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी घनश्याम पुंड आणि त्यांचे चुलते प्रकाश पुंड हे ट्रॅक्टर (एमएच 16 सीवाय 6315) आणि विनानंबर ट्रॉली घेऊन आपल्या घरी चालले होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका विनानंबर डंपर वाहन चालक दीपक जाधव याने साईट दिली नाही, यावरून वाद झाला.
वाद विकोपास जाताच दीपक जाधव व इतर संशयित आरोपींनी घनश्याम व त्यांच्या चुलत्यास शिवीगाळ करत मारहाण केली. लाकडी दांडे, लोखंडी पाइप व दगडांचा वापर करून हल्ला केला. तसेच, जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस अंमलदार थोरात करीत आहेत.