नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी तपास अधिकाऱ्यांवर मोठा आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि इतरांचे नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता असे मत प्रज्ञा ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे.
एनआयएच्या विशेष न्यायालयाचा प्रज्ञा ठाकूर यांना दिलासा
एनआयएच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी (31जुलै 2025 प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने म्हटले आहे की त्यांना (आरोपींना) दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. या प्रकरणात एकूण 14 जणांना अटक करण्यात आली होती. परंतु केवळ सात जणांवर खटला चालवण्यात आला होता, कारण आरोप निश्चित करताना उर्वरित सात जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते.
गुजरातमध्ये राहत होते मला पंतप्रधान मोदींचे नाव घेण्यास सांगितले
प्रज्ञा ठाकूर यांनी आज (2 ऑगस्ट 2025) दिलेल्या माहितीनुसार, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना मला भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव यांच्यासह अनेक लोकांची नावे सांगण्यास सांगितले. त्यांनी हे सर्व करण्यासाठी मला छळले. माझे फुफ्फुस निकामी झाले, मला रुग्णालयात बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आले. मी गुजरातमध्ये राहत होते म्हणून त्यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेण्यास सांगितले. मी कोणाचेही नाव घेतले नाही कारण ते मला खोटे बोलण्यास भाग पाडत होते असे ठाकूर म्हणाल्या. प्रज्ञा ठाकूर यांचा हा दावा या खटल्याच्या निकालानंतर लगेचच आला आहे, ज्यामध्ये एका साक्षीदारानेही दावा केला होता की त्यांना योगी आदित्यनाथ आणि संघाशी संबंधित इतर चार लोकांना गुंतवण्यास भाग पाडण्यात आले होते. यामध्ये संघाचे वरिष्ठ सदस्य इंद्रेश कुमार यांचेही नाव होते.
माजी एटीएस सदस्य मेहबूब मुजावर यांनीही केले आरोप
माजी एटीएस सदस्य मेहबूब मुजावर यांनी असाही दावा केला होता की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. परंतू त्यांनी तसे करण्यास नकार दिला. न्यायालयाने हे दावे फेटाळून लावले होते. मुजावर यांनी शुक्रवारी असाही दावा केला की या आदेशाचा उद्देश तपास चुकीच्या दिशेने नेणे आणि भगवा दहशतवादाचा खटला बनवणे होता असे मुजावर म्हणाले.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
देशातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या दहशतवादी खटल्यांपैकी एक असलेल्या 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात, बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत, खून आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल सात जणांवर खटला चालवण्यात आला. 29 सप्टेंबर 2008 रोजी, मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ मोटारसायकलवर लावलेल्या स्फोटक यंत्राचा स्फोट झाला, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आणि 101 जण जखमी झाले होते.