महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे स्पष्टीकरण
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महानगरपालिकेत सुमारे ७७६ रस्त्यांच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या बातम्या सोशल मीडियात दाखवल्या जात आहेत. असा कोणताही घोटाळा महानगरपालिकेत झालेला नाही. अशी तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही. शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नावाचा बनावट टेस्ट रिपोर्ट केल्याचा आरोप आहे, त्याबाबतही तक्रार पाहण्यात आलेली नाही. मात्र, बनावट टेस्ट रिपोर्ट म्हणजे त्याचा अर्थ काम झालेच नाही, असा होत नाही, असे सांगत रस्त्याच्या कामांमध्ये कोणताही घोटाळा, अपहार झालेला नसल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
बनावट टेस्ट रिपोर्टच्या माध्यमातून महानगरपालिकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या बातम्या सुरू आहेत. यात शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या वरदहस्ताने तत्कालीन महापौर व पदाधिकाऱ्यांनी हा घोटाळा केल्याचे आरोप होत आहेत. याबाबत आता महानगरपालिकेने खुलासा केला आहे. काम न करता खोटे बिले काढल्याचा, असा कोणताही घोटाळा झालेला नाही. महानगरपालिका केलेल्या कामांची देयके अदा करण्यापूर्वी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून टेस्ट रिपोर्ट करून घेते. ही प्रशासकीय प्रक्रिया आहे. महाविद्यालयाचे टेस्ट रिपोर्ट बनावट असल्याबाबत महानगरपालिकेकडे अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्याची तक्रारही माझ्याकडे आलेली नाही. तक्रार आल्यास याबाबत पडताळणी केली जाईल. मात्र, रिपोर्ट बनावट असले तरी रस्त्याचे काम झालेले नाही, काम न करताच बिल अदा झाले, असा कोणताही घोटाळा झालेला नसल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.
शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या महानगरपालिकेतील हस्तक्षेपाचा आरोपावरही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्टीकरण दिले आहेत. महानगरपालिकेचे कामकाज हे महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार चालते. शहरातील जनतेने जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत, त्यांनी नागरिकांच्या तक्रारी, मागण्या आदींबाबत केलेल्या त्यांच्या सूचना महानगरपालिकेला विचारत घ्याव्या लागतात, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.