अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शिवसेना (शिंदे गटाचे) अहिल्यानगर संपर्क प्रमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, ओबीसी नेते बाजीराव दराडे यांनी, अखेर राजीनामा देत शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेना (शिंदे) गटाचा मी राजीनामा दिला आहे. शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादीसह भाजपा पक्षाच्या ऑफर आल्या, परंतू मला कोणाचे जोडे उचलायचे नाहीत. मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. ओबीसी संघटनेचा स्वतःच्या फायद्यासाठी कधीही वापर करणार नाही. या समाजाच्या सर्वागीण विकासासाठी मी सदैव लढणार आहे, असल्याचे दराडे यांनी जाहीर केले.
अकोले तालुक्यातील ओबीसी समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळाव्यात दराडे बोलत होते. .दराडे म्हणाले, राजकारणात काम करताना मी कधीही कुणाची जात- धर्म पाहिला नाही. वंचित घटकाला न्याय मिळून देण्याचा प्रयत्न केला. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले, त्यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातून मी पहिले समर्थन त्यांना दिले. संघटना वाढविली, पण त्याचे फळ मला काय मिळाले, हे तुम्ही पाहिले आहे, असे दराडे यांनी ठणकावून सांगितले. यावेळी बाळासाहेब वाक्चौरे, नितीन बेनके, वसंत बाळसराफ, अलका मंडलिक, अमित रासने, गणेश ताजणे, संतोष खांबेकर, बाळासाहेब ताजणे, संदीप दराडे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन प्रवीण शिंदे यांनी केले.
शिवसेना (शिंदे गटाचे) अहिल्यानगर संपर्क प्रमुख व ओबीसी नेते बाजीराव दराडे यांनी पदाचा राजीनामा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला आहे. दराडे यांनी, आता यापुढे राजकारण करणार नाही, असे स्पष्ट केले. ओबीसीच्या न्याय हक्कासाठी सदैव या समाजाला सोबत घेऊन लढणार आहे. राजकारणासाठी आपला वापर होऊ द्यायचा नाही. आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाज निर्णयक राहणार आहे. हाती घेतलेले मिशन पूर्ण करण्यासाठी अकोलेत महामेळावा घेऊन, ओबीसी एल्गार महाराष्ट्रात पोहचविणार आहे, असे सुतोवाच दराडे यांनी केले.