अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील नालेगाव परिसरात एका कुटुंबाच्या घरासमोर पार्क केलेल्या तीन दुचाकींना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या आगीत सुमारे 55 हजार रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अंबादास रामभाऊ रोहकले (वय 60, रा. रोहकले गल्ली, नालेगाव) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रोहकले हे वॉचमन म्हणून काम करतात व आपल्या कुटुंबासमवेत नालेगाव येथे राहतात. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी, त्यांच्या पत्नीने व मुलाने वापरणाऱ्या तिन्ही दुचाकी घरासमोर पार्क केल्या होत्या.
शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास नातेवाईक सुहास आढाव यांनी फोन करून दुचाकींना आग लागल्याची माहिती दिली. तत्काळ घराबाहेर धाव घेतल्यानंतर कुटुंबीयांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तोपर्यंत दुचाक्यांचे मोठे नुकसान झाले होते. आग कोणीतरी लावली की ती अन्य कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, अधिक तपास सुरू आहे. रोहकले कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाईची
मागणी केली आहे.