Crime News: : शहरातील शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, स्पा सेंटरच्या आड चक्क कुंटणखाना चालविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी छापा टाकून चार महिलांची सुटका केली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचा नांदेड दक्षिण युवासेना जिल्हाध्यक्ष अमोदसिंग साबळे याच्याच मालकीच्या स्पा सेंटरमध्ये हे अनैतिक कृत्य सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, अश्लील कृत्ये सुरु असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी नागसेन गायकवाड, संतोष इंगळे आणि रोहन गायकवाड या तिघांना अटक करण्यात आली असून, मालक अमोदसिंग साबळे व मॅनेजर मनोज जांगिड हे फरार झाले आहेत. पोलिसांनी स्पा सेंटरमधून चार महिलांची सुटका केली असून, १६,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडीवाले यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४४५/२०२५ अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५(१)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.