मुंबई । नगर सहयाद्री-
Lok Sabha 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी राज्यातील महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फूटीनंतर दोन्ही पक्ष कमजोर झाल्याचे म्हटले. तसेच माध्यामांमध्ये वक्तव्य करण्यापेक्षा एकत्र बसून चर्चा करावी, असा सल्लाही दिला. यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष असून काँग्रेसला शुन्यापासून सुरूवात करायची आहे. आम्ही २३ जागा लढवणारच, असे ठामपणे सांगितले.
राऊत म्हणाले, आम्ही २३ जागा लढवत आलो आहोत आणि त्याबद्दल काँग्रेस हायकमांडशी चर्चा देखील सुरू आहे. शिवसेना महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांशी आमची बोलणी सुरू आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, खर्गे, वेणुगोपाल या निर्णय घेणार्या नेत्यांशी उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू आहे. कोण किती जागा लढवणार याची चर्चा दिल्लीत होईल. येथे गाव-गल्लीतील लोक राष्ट्रीय स्तरावरील विषयांवर बोलत असतील तर कोण ऐकणार? असा नाव न घेता टोला लगावला.
राऊत म्हणाले, आम्ही सांगितलं की आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या २३ जागा लढवत आलो आहोत. या आमच्या जागा आम्ही कायम ठेवणार आहोत. राष्ट्रवादी आणि आम्ही जिंकलेल्या जागांवर नंतर बोलणी होतील, असे पहिल्या आणि दुसर्या बैठकीत ठरवण्यात आले होते. काँग्रेसने महाराष्ट्रात एकही जागा जिंकली नाही.
काँग्रेसला महाराष्ट्रात शून्यापासून सुरूवात करायची आहे. पण काँग्रेस आमचा महाविकास आघाडीचा महत्वपूर्ण साथीदार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना मिळून काम करतील. आम्हाला काही अडचण नाही. तसेच काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडला देखील कुठलीच अडचण नाही. त्यामुळे इथे तीथे कोणी काही बोलत असेल तर लक्ष देण्याची अवश्यकता नाही.