अहमदनगर । नगर सहयाद्री:-
शहरातील सर्व खाजगी व इंग्रजी शाळांमध्ये शासनाच्या सर्व आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी करावी. शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व खाजगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इ. ४ थी पर्यंतचे सर्व वर्ग सकाळी ९ वाजता अथवा त्या नंतर घेण्याबाबतचे आदेश सर्व शाळांना द्यावेत. शासनच्या या आदेशाची नगरमध्ये जर ८ दिवसात अंमलबजावणी झाली नाहीतर महाराष्ट्र नावनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्यांच्या दालनास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नावनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सुमित वर्मा यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी पाटील यांना वरील मागणीचे निवेदनाद्वारे दिले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, राहुल वर्मा, प्रसाद साळवे, अमोल भालसिंग, संदिप काळे, अक्षय अहिरे आदी उपस्थित होते.शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना सोयीस्करपणे शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने वेळोवेळी महत्वाचे निर्णय घेत त्यांची अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. मात्र हे निर्णय व आदेश फक्त जिल्हा परिषदेच्याच शाळांपर्यंतच मर्यादित आहे का? हा प्रश्न पालकांना पडला आहे.
१४ जून २०२४ रोजीच्या शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व शाळांना निर्देश दिले होते की ईयत्ता ४ थी पर्यंतचे सर्व वर्ग सकाळी ९ वाजता अथवा त्या नंतर घेण्यात यावेत. या आदेशाला खाजगी शाळा व इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी केराची टोपली दाखवली आहे. नगरमधील सर्व शाळा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे चालाव्यात तसेच इ.४ थी पर्यंतचे सर्व वर्ग सकाळी ९ वाजता अथवा नंतर घेण्यात यावेत या आदेशांची सर्व खाजगी शाळांमध्ये ८ दिवसात तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शिक्षणाधिकार्यांच्या दालनाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा निवेदना दिला आहे.