पारनेर । नगर सहयाद्री:-
वडगाव आमली येथील साठा बंधाऱ्याचे गाळमुक्ती आणि खोलीकरणाचे काम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेमुळे पाणी साठवण क्षमता वाढेल आणि शेतीला नवसंजीवनी मिळेल. टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वी होईल. असे मत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ पाटील यांनी व्यक्त केले.
वडगाव आमली येथील साठा बंधाऱ्यामधील गाळ काढणे आणि खोलीकरणाच्या महत्त्वाकांक्षी कामाला आज महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत भव्य शुभारंभ झाला. टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे परिसरातील जलसाठ्याची क्षमता वाढणार असून, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.
या कामाचा शुभारंभ लोकप्रिय आमदार काशिनाथ दाते यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, ज्येष्ठ नेते वसंत चेडे, सुभाषराव दुधाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीच्या सुपीकतेत वाढ होण्यास मदत होईल आणि गाळमुक्त बंधाऱ्यामुळे पाण्याचा साठा दीर्घकाळ टिकून राहील, असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाला गावातील शंकर ढोणे, रामदास बोरूडे, बाळासाहेब सोनावळे, शिवाजी पवार, जनार्धन डेरे, संतोष सोनावळे, सुभाष डेरे, प्रशांत ढोणे, योगेश ढोणे, साहेबराव गुंजाळ, सुनिल जाधव, तुकाराम पवार, पोपट डेरे, भाउसाहेब सोनावळे, दत्तात्रय पवार, अप्पा पवार, किसन जाधव, आण्णा सालके, मोहन काळे, नवनाथ काळे, नवनाथ सालके यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, यामुळे गावाच्या शेती आणि जलसंधारणाला नवसंजीवनी मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना ग्रामीण भागातील शेती आणि पाणी व्यवस्थापनासाठी क्रांतिकारी ठरत आहे. वडगाव आमली येथील साठा बंधाऱ्याचे गाळमुक्ती आणि खोलीकरणाचे काम स्थानिक शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणेल. यामुळे बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता वाढेल आणि शेतजमिनीची सुपीकता सुधारेल. प्रकल्प यशस्वी होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे.
– विश्वनाथ कोरडे (राज्य कार्यकारणी सदस्य भाजपा)