अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर शहरातील नागरिकांना रोज पाणी पुरवठा करावा आणि मगच पाणीपट्टीत वाढ करावी अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे.
मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी मनपाच्या पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला तो तातडीने त्यांनी मागे घ्यावा. सदर दरवाढ अन्यायकारक असून प्रशासनाने आधी नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा. सध्या शहराला वर्षातून फक्त सहा मंहिने पाणीपुरवठा होतो आणि तो सुद्धा पूर्ण दाबाने होत नाही.
अशा परिस्थितीत पाणीपट्टीत वाढ करणे चुकीचे आहे. आजही नगरमधील नागरिकांना पुरेशा व मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही. सामान्य नागरिक तर पूर्ण वर्षाची पाणीपट्टी भारतात. काही उपनगरांमधील भागात तर आठ आठ दिवस पाणी मिळत नाही. याचाही विचार प्रशासनाने करणे गरजेचे असल्याचे मत अविनाश घुले यांनी व्यक्त केले.
अविनाश घुले पुढे म्हणाले की वास्तविक मनपामध्ये सध्या प्रसासक राज आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न मांडणारे नगरसेवक त्या ठिकाणी नसल्यामुळे प्रशासन तातडीने पाणीपट्टी वाढ जाहीर करून मोकळे झाले. 1500 रुपयांवरून थेट तीन हजार रुपये करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ही दरवाढ सामान्य जनतेसाठी अन्यायकारक आहे.
मनपाने सर्वात प्रथम नियमित व पुरेशा दाबाने सर्वांना समान पाणीवाटप होईल यादृष्टीने पावले उचलली पाहिजेत. त्यानंतर त्यांना पाणीपट्टीचा विचार करणे गरजेचे आहे. नाहीतर सर्व नागरिकांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा अविनाश घुले यांनी दिला आहे.