ठाकरे शिवसेनेच्या तक्रारीनंतर प्रभाग रचना प्रकरणी तात्काळ अहवाल देण्याचे आदेश
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मुदत उलटून ही मनपाची अंतिम प्रभाग रचना अद्यापही जाहीर नाही. पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव यांनी यावर गंभीर आक्षेप घेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याची लेखी तक्रार 14 ऑक्टोबरला राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याची गंभीर दखल आयोगाने घेतली आहे. राज्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशाने आयोगाने नगर विकास विभागाला अंतिम प्रभाग रचना प्रकरणी तत्काळ वस्तुस्थितिदर्शक सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. भाजप, राष्ट्रवादी, शिंदे सेना यांच्या सुरू असलेल्या प्रभाग चोरीचा जनतेसमोर आता भांडाफोड झाला असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे सेनेचे किरण काळे यांनी केला आहे.
ठाकरे शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे. आपापसातील अंतर्गत कुरघोडी, पराभवाची भीती यामुळे मंत्रालयात बसून सत्ताधारी प्रभागांची चोरी करत असल्याचा घाणाघाती आरोप काळे यांनी केला आहे. आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहेत. किरण काळे यांनी तक्रारीत सहा मागण्या केल्या होत्या. शिवसेनेची तक्रार येण्यापूव आयोगाने कारवाई का केली नाही ? आयोग हे सरकारच्या ताटा खालचं मांजर असल्याचा गंभीर आरोप काळे यांनी केला आहे.
..तर मग निवडणुकाच घेऊ नका
नगरविकास, आयोग, सत्ताधारी पक्ष, शहर लोकप्रतिनिधी यांनी संगमतातून नगर मनपाची निवडणूक मॅनेज केली आहे. मनमानी सुरू आहे. कायद्याचं राज्य उरलेलं नाही. त्यापेक्षा हुकूमशाही बरी अस म्हणण्याची वेळ आली आहे. अशा पद्धतीने निवडणुका होणार असतील तर मग त्या घेताच कशाला? इलेक्शन घेण्याऐवजी आपल्या बगल बच्च्यांच सिलेक्शन करून 68 नगरसेवक सत्ताधाऱ्यांनी जाहीर करून टाकावेत, असा खरमरीत टोला किरण काळे यांनी लगावला आहे.