Manoj Jarange Patil : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे, अशी मागणी केली आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण गेल्या अनेक दिवसांपासून तापले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तिय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यांनी अखेर राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे म्हणाले, चार्जशीट दाखल झाल्यावर राजीनामा देण्याची नौटंकी केली जातेय. जर त्यांच्यात नैतिकता असती, तर त्यांनी आधीच पद सोडले असते. पण हा प्रकार म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो यासारखा आहे. धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करा. दोन ते तीन महिन्यात प्रकरण संपवा.
या सर्वांना फाशी द्या असं जरांगे म्हणाले. यांची लंका पाण्यात बुडणार आहे. मग्रुरीमुळे यांचा कार्यक्रमच होणार आहे. आजही राजीनामा देताना मग्रुरी दाखवली. आजाराचं कारण दाखवलं. त्यांनाही खूनाचा पश्चात्ताप नाही. जे आरोपी हसत होते खून करताना तसंच हे हसत आहेत, असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.



