अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
राहुरीच्या मुळा धरणात पोहण्यासाठी पाण्यात उतरलेला 35 वर्षीय विवाहित तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अहिल्यानगर एमआयडीसी येथून फिरण्यासाठी आलेल्या तरुणांना पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यात ही दुर्घटना घडली. भगवान रुस्तुम घाडगे (वय 35) रा. नागापूर रेणुका माता मंदिर परिसर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
भगवान घाडगे हा आपल्या सात ते आठ मित्रांबरोबर रविवार दि.18 मे रोजी मुळा धरण येथे फिरण्यासाठी आला होता. मुळा धरणाचे पाणी पाहून धरणामध्ये पोहण्याचा मोह न आवरल्याने हे सर्व तरुण पाण्यामध्ये पोण्यासाठी उतरले. यावेळी भगवान घाडगे हा पोहत असताना अचानक पाण्यात बुडू लागला. सोबत असलेल्या तरुणांनी मोठी आरडा-ओरड केली. मात्र तो पाण्यात दिसेनासा झाला.
यावेळी बरोबर आलेल्या तरुणांनी भगवान याचा शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही. अखेर भगवान घाडगे यांचा मृतदेह काल मंगळवार दि. 20 मे मुळा धरणाच्या मत्स उद्योग केज परिसरात सकाळी सहा वाजे दरम्यान पाण्यावर तरंगताना आढळून आला. भगवान घाडगे याचा मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत घाडगे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.